Electricity Bill Reduction : राज्यातील लाखो ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या १ जुलै 2025 पासून वीजदरात कपात होणार असून, त्यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरकर्त्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विजेच्या दरांमध्ये टप्प्याटप्प्याने घट होणार असून, पुढील पाच वर्षांत ही कपात सुमारे २६% पर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
कमी युनिट वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा
ज्यांचे मासिक वीजवापर 100 युनिटपर्यंत आहे, अशा ग्राहकांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. राज्यातील सुमारे ७०% ग्राहक हे कमी युनिट वापरणारे आहेत. सध्या अशा ग्राहकांकडून एका युनिटसाठी 6.32 रुपये आकारले जात होते. मात्र आता 5.74 रुपये प्रति युनिट इतकी दरकपात झाली असून, प्रतियुनिट ०.५८ रुपयांची थेट बचत होणार आहे.
यानुसार, अशा ग्राहकांचे मासिक अंदाजे ३० ते ६० रुपये आणि वर्षाकाठी जवळपास ७०० रुपयांपर्यंत वीजबिल कमी होणार आहे.
उच्च वापरकर्त्यांना थोडी दरवाढ
दुसरीकडे, ज्यांचा विजेचा वापर 100 युनिटपेक्षा अधिक आहे, अशा ग्राहकांना काहीशी दरवाढ सहन करावी लागणार आहे:
- 101 ते 300 युनिट वापरणाऱ्यांसाठी दर 12.23 वरून 12.57 रुपये
- 301 ते 500 युनिट वापरासाठी दर 16.77 वरून 16.85 रुपये
- 500 युनिटपेक्षा जास्त वापर करणाऱ्यांसाठी दर 18.93 वरून 19.15 रुपये
ही दरवाढ मर्यादित आहे आणि वापरकर्त्यांना जवाबदारीने वीज वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरधारकांना मिळणार विशेष सवलत
या दरकपातीसह काही नव्या सवलती आणि योजना सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. ज्यांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवलेले आहेत, अशा ग्राहकांना दिवसाच्या वेळेत वीज वापरल्यास १०% अतिरिक्त सूट मिळणार आहे. याला Time of Use (TOU) सवलत असे म्हटले जाते. दिवसाच्या वेळेस वीजवापर वाढवून संध्याकाळच्या तासांतील ताण कमी करण्याचा हेतू यामागे आहे.
सौर ऊर्जेला प्रोत्साहन
घराच्या छतावर सौर पॅनल बसवणाऱ्यांना देखील वीजबिलात विशेष सूट मिळणार आहे. त्यामुळे वीजबचत होण्याबरोबरच हरितऊर्जेला चालना मिळणार आहे. शिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दिवसा शेतकऱ्यांना वीज पुरवठा अधिक सुरळीत करण्यात आला आहे, ज्यामुळे राज्याच्या वीजखरेदी खर्चात घट झाली आहे.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, “वीज उत्पादन व्यवस्थापनात सुधारणा, सौर ऊर्जेचा अधिक वापर आणि स्मार्ट मीटर यामुळे दर कमी करणे शक्य झाले आहे. याचा थेट लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळेल.”